Ad will apear here
Next
त्रिंबकजी डेंगळे


पेशव्यांचे शूर सरदार त्रिंबकजी डेंगळे यांचा स्मृतिदिन नुकताच होऊन गेला. त्या निमित्ताने, त्यांच्याबद्दलची ही माहिती...

......
त्रिंबकजी डेंगळे ही मध्यमवर्गीय घरातली व्यक्ती होती. दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या स्वामीनिष्ठेमुळे ते पेशव्यांच्या नजरेत भरले. बाजीराव पेशवे (दुसरे) पुणे सोडून महाडला गेले तेव्हा त्रिंबकजी त्यांच्याबरोबर होते. त्रिंबकराव डेंगळे यांनी बाजीराव पेशवे यांचे गुप्त पत्र पुण्यात पोहोचवले, म्हणून पेशव्यांची त्रिंबकजी डेंगळे यांच्यावर मर्जी बसली. त्रिंबकजींनी पेशव्यांच्या पडत्या काळात त्यांची अनेक कामे मोठ्या कौशल्याने पार पाडून त्यांची मर्जी संपादन केली. सातारच्या छत्रपतची देखरेख करणे हे त्रिंबकजींवर सोपवलेले पहिले मोठे राजकीय काम होते. ते त्यांनी चोखपणे पार पाडले. ही तारेवरची कसरत करीत असताना त्यांचा धोरणीपणा पेशव्यांच्या लक्षात आला होता. 

पुण्यात पेशव्यांचा तोफखाना सरदार पानसे यांच्याकडे होता. त्याची व्यवस्था नीट होत नाही असे पाहताच पेशव्यांनी तो पानश्यांकडून काढून त्रिंबकजी डेंगळ्यांकडे सोपवला. इंग्रजांचे सामर्थ्य त्यांच्या तोफखान्यात आहे हे ओळखून त्रिंबकजींनी मोठ्या हिमतीने भांबुर्ड्याला तोफांचा कारखाना सुरू केला. त्रिंबकजींची हुशारी, तडफ, तरतरीतपणा व कामांतील दक्षता पाहून ते बाजीरावांचे विश्वासू सेवक बनले. 

वसईच्या तहाने आपले स्वातंत्र्य नष्ट झाल्याची जाणीव रावबाजीस मधून मधून होई व ते पुन्हा मिळविण्याची त्याची इच्छाही होती. पण स्वतः कर्तबगार व धाडसी नसल्यानें कोणाची तरी त्याला मदत लागे. असे विश्वासू मदतनीस त्याच्याजवळ फारसे कोणी शिल्लक राहिले नव्हते. बहुतेकांनी इंग्रजांशी स्वतंत्र तह करून आपापला स्वार्थ सांभाळला होता. त्रिंबकजी धाडसी असल्याने पेशव्यांनी त्यांनाच हाताशी धरले. त्रिंबकजी हे इंग्रजांचे द्वेष्टे होते. इंग्रजांचा कावा ओळखून त्याला तोड देणारा व मराठी साम्राज्य टिकविण्यासाठी धडपडणारा त्रिंबकजी हा बापू गोखल्यांप्रमाणे पेशवाईंतील शेवटचा पुरुष होता. नाना फडणवीसानंतर इंग्रजांना त्रिंबकजीचा धाक होता. 

त्रिंबकजीने महत्त्वाची ठाणी आपल्या विश्वासू माणसांच्या ताब्यात देण्यास सुरुवात केली. दक्षिणेस धारवाडचा किल्ला मजबूत असल्याने तो कब्जात घेण्याची त्रिंबकजी यांनी खटपट केली. परंतु तेथील किल्लेदार किल्ला त्याच्या हवाली करीना. तेव्हा बापू गोखले याने मध्यस्थी करून किल्ला त्रिंबकजीस देवविला. त्रिंबकजीने पेशव्यांस सल्ला देऊन पेशव्यांची मर्जी संपादन केली. त्रिंबकजी अत्यंत कडक शिस्तीचा होता. त्याच्या शिक्षा सौम्य, तर कधीं अत्यंत कडकही असत. ठरल्याप्रमाणें इनामदार लोकांनी चुकारपणा करून वसूल भरणा केला नाही तर तो त्यांना शिक्षा करी. 

१८१४ साली त्रिंबकजीने गुजरातेत सरकारी फौज पाठवून गायकवाडांकडे असलेले प्रांत ताब्यात घेतले. कारण त्या वेळी गायकवाडांचा गुजरात करार संपला होता व नवीन करार करावयाची गायकवाडांची इच्छा होती. त्यासाठी त्यांचा दिवाण गंगाधरशास्त्री पटवर्धन हा पुण्यास पेशव्यांकडे आला. शास्त्री फार हट्टी, हेकट व इंग्रजांच्या बळावर सर्वांस तुच्छ लेखणारा होता. गायकवाडाकडे सरकारची बाकी एक कोटी निघाली. ती देऊन मग वाटल्यास करार करावा असे दरबारांत ठरले; परंतु गायकवाडाने ते नाकारले व हे प्रकरण चिघळत चालले. 

इतक्यांत पंढरपुरास गंगाधर शास्त्र्याचा खून झाला. या खुनाचा आरोप इंग्रजांनी त्रिंबकजीवर केला; हा खून त्रिंबकजीने केला नव्हता. शास्त्र्यांचा खून करण्यांत पेशव्यांचा अथवा त्रिंबकजी यांचा मुळीच फायदा नव्हता. कारण त्यामुळें गुजरात हातची जात होती, उलट शास्त्रीजींना जिवंत राखण्यातच फायदा होता. आपल्या मार्गांतील त्रिंबकजी यांचा काटा काढण्यासाठी इंग्रजांनी खुनाचा आरोप त्रिंबकजीवर केला. 

त्रिंबकजीने आपला खुनाशी काही संबंध नाही किंवा आपणास त्यासंबंधी काही माहितीही नाही असे चक्क सांगितले. तथापि इंग्रज रेसिडेंटनें आपल्या फौजेच्या बळावर त्रिंबकजीस आपल्या स्वाधीन करण्याविषयी बाजीरावाच्या मागे लकडा लावला; पण बाजीराव त्रिंबकजी यांना इंग्रजांच्या हवाली करण्यास तयार होत नव्हते. शेवटी नाइलाजानें बाजीरावाने त्रिंबकजीस वसंतगड नामक किल्ल्यात अटकेत ठेवले. तरीही इंग्रजांचे समाधान न होता त्यांनी त्रिंबकजीस आपल्याच हवाली करण्याचा तगादा लावला. तेव्हा घाबरून बाजीरावाने त्यास इंग्रजांच्या स्वाधीन केले. 

इंग्रजांनी त्रिंबकजीस ठाण्याच्या किल्ल्यात अटकेत ठेवले. त्याच्यावर जे पहारेकरी ठेवले होते त्यांत बहुधा, खबरदारी घेण्याच्या उद्देशानेच, एकही हिंदी माणूस ठेवला नव्हता. ह्याचा फायदा घेऊन त्रिंबकजीने सप्टेंबरच्या दरम्यान तटावरून उडी मारून आपली सुटका करून घेतली. 

त्रिंबकजी निसटून जाण्याच्या काही दिवस अगोदर त्याची मित्रमंडळी व नोकरचाकर त्यांची वाट पाहत होते. त्रिंबकजीस त्यांचा निरोप कळविण्याचे काम किल्ल्यांतील एका अधिकाऱ्याच्या मोतद्दारानें केलें. त्रिंबकजीस ज्या खोलीत ठेवले होते तेथील शिपायाला मराठी येत नव्हते. त्यामुळे त्रिंबकजीचा कावा त्याला ओळखता आला नाही. त्रिंबकजीने ज्या अडचणींतून आपली सुटका करून घेतली ती हकीकत ऐकून लोकांत त्याच्याबद्दल कौतुक व आदर वाढला. 

यानंतर त्रिंबकजीने पुन्हा फौज जमवून कधी नाशिक तर कधी संगमनेर अशा डोंगरांत, कधी खानदेश बागलाणात, तर कधी साताऱ्याकडील महादेव पर्वतांत फिरून इंग्रजांच्या विरुद्ध दंगा उसळून दिला. त्याला पकडण्यासाठीं इंग्रजांनी फार खटपट केली. परंतु पुष्कळ दिवस ती सिद्धीस गेली नाही. त्याचा खरा पत्ताच लागेना. तो आपल्या सासुरवाडीस अहिरगावी गुप्तीपणे जाऊन राहिला होता. 

कोरेगावची लढाई होऊन एलफिन्स्टनने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला होता; त्याप्रमाणे पेशवाईतील सर्व मराठे सरदार, इनामदार इंग्रजांना मिळाले होते व रावबाजी एकटे पडले होते. इंग्रजांनी तशाही स्थितीत त्रिंबकजी हा पेशव्यांच्या तर्फे धुमाकूळ घालीत असल्याने त्याला पकडण्यासाठी मोठमोठीं बक्षिसे लावली. तेव्हा एका स्त्रीने व त्रिंबकजीचा नोकर नाना याने फितूर होऊन, ब्रिग्ज यांस त्रिंबकजीच्या ठिकाणाची माहिती दिली. कॅ. स्वान्स्टन हा एक हजार घोडदळाची पलटण घेऊन अहिरगावी आला. त्या वेळी त्रिंबकजी तेथे एकटाच होता. फौजफाटा मुळीच नव्हता. गावाची नाकेबंदी करून इंग्रजांनीं पहाटें त्रिंबकजीच्या वाड्यास गराडा दिला. वाडा दोनदां तळघरे बळदासंकट शोधला. परंतु त्रिंबकजी सापडेना. शेवटी तिसऱ्यादा पुन्हां शोधले तेव्हा मात्र त्रिंबकजी सांपडले. 

एका बळदात एका लोखंडी चोरदाराच्या पलीकडे बुरुजावर जाण्याचा एक जिना होता. तिथली भिंत त्रिंबकजी फोडीत होता. त्याला धरण्यास जात असता जिन्यावरील एका मराठ्याने त्यांना अडथळा केला. जी जी माणसे धरण्यास गेली ती या मराठ्याने आपल्या भाल्याने ठार केली. त्यांची संख्या तीस भरली. शेवटी स्वान्स्टनने भालाइतावर गोळ्या झाडण्यास हुकूम केला व त्यामुळे मात्र तो मराठा पडला. असा तो शूर भालाइत पुरुष नसून ती त्रिंबकजीची स्त्री आहे हे समजल्यावर स्वान्स्टन यास फार आश्चर्य वाटले. 

त्रिंबकजी भिंत फोडीत असता, त्याच्या अंगावर जाण्याची हिंमत कोणाचीच होईना. तेव्हा निराशेने त्रिंबकजी आपणच होऊन इंग्रजांच्या स्वाधीन झाला. त्यास नंतर बंगालमध्यें एका किल्ल्यात अखेरपर्यंत कैदेत ठेवले. त्याची ९० हजार रुपयांची मालमत्ता इंग्रजांनी जप्त  करून ती स्वान्स्टन यास बक्षीस दिली. शेवटी १६ ऑक्टोबर १८२९ रोजी या शूर त्रिंबकजी डेंगळे यांचा मृत्यू झाला. 

अशा या थोर त्रिंबकजी डेंगळे यांना विनम्र अभिवादन.

- डॉ. सुवर्णा नाईक-निंबाळकर

(इतिहास अभ्यासक, पुणे)



 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/IWHACR
Similar Posts
कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे छत्रपती राजाराम महाराजांच्या तिसऱ्या पत्नी राजसबाई यांच्या पोटी जन्माला आलेले संभाजीराजे हे कोल्हापूर राज्याचे दुसरे छत्रपती. २० डिसेंबर हा त्यांच्या स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांच्याविषयी...
स्त्री-शिक्षणासाठी झटलेल्या श्रीमंत इंदुमती राणीसाहेब राजर्षी शाहू महाराजांच्या स्नुषा श्रीमंत इंदुमती राणीसाहेबांनी स्त्री-शिक्षणविषयक, तसेच अन्य सामाजिक कार्यातून राजर्षी शाहू महाराजांचा वारसा समर्थपणे पुढे चालवला. ३० नोव्हेंबर हा त्यांचा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...
दुसरे छत्रपती प्रतापसिंहराजे भोसले (सातारा) साताऱ्याचे छत्रपती प्रतापसिंहराजे भोसले यांचा १४ ऑक्टोबर हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने...
पुण्यश्लोक छत्रपती थोरले शाहू महाराज १८ मे १६८२ या दिवशी छत्रपती संभाजी महाराज व महाराणी येसूबाई राणीसाहेब यांना पुत्ररत्न झाले. हेच पुढे थोरले शाहू म्हणून इतिहासात अजरामर झाले. १५ डिसेंबर हा त्यांचा स्मृतिदिन. त्या निमित्ताने...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language